भंडारा - एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन त्याआधारे पैसे काढणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. हा मुख्य आरोपी एका राष्ट्रीय बँकेचा कर्मचारी असल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा सहकारी अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईहून आरोपी रणधीरकुमार सिंह याला अटक केली आहे.
डिसेंबर महिन्यात भंडारा जिल्ह्याच्या नागरिकांच्या खात्यातून पैसे अचानक गायब होण्याच्या तक्रारी पोलीस ठाण्याला प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने पोलीस विभागाने तपास सुरू केले असता. भंडारा शहरातील एटीएममधून क्लोनिंग केलेल्या कार्डद्वारे पैसे काढले जात असल्याचे पुढे आले. या पद्धतीने 1 लाख 34 हजार रुपये परस्पर काढल्याची तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
सायबर सेलच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य
पोलिसांनी तक्रारीनंतर भंडारा शहरातील एटीएममध्ये तपासणी सुरू केली असता ज्या एटीएममधून पैसे काढले होते त्याचे फुटेज तपासले तेव्हा 3-4 तरुण एटीएम मशीनमध्ये छेडछाड करताना दिसले. पोलिसांनी लगेचच तापसाची सुत्रे फिरवली. त्यांच्या तपासात एटीएम क्लोनिंगचे कनेक्शन मुंबई व झारखंडमध्ये आढळून आले.