भंडारा - जिल्ह्यात 18 जुलैपर्यंत सरासरी पाऊस झाल्यावरही जिल्ह्यातील केवळ 21 टक्के धानाची रोवणी झालेली आहे. पुढच्या आठ दिवसात रोवणीयोग्य पाऊस बरसला नाही तर पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकर्यांना बसणार आहे. जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस न पडल्याने रोवण्या रखडलेल्या आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे परे 21 दिवसाच्या वर झाल्याने उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांचे परे हे पिवळे पडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी दररोज आकाशाकडे डोळे लावून ईश्वराची एकच प्रार्थना करतोय, की शक्य तेवढ्या लवकर पाऊस येऊ दे.
1 लाख 81 हेक्टरवर होणार लागवड
धान्याचा कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात 2021 मध्ये खरिपातील 1 लाख 81 हजार हेक्टरवर लागवड होणार आहे. मात्र जुलैमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने 18 जुलैपर्यंत केवळ 21 टक्के रोवण्या पूर्ण झालेल्या आहेत. यावर्षी अपेक्षेनुसार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. जूनमध्ये पावसाने व्यवस्थित हजेरी लावली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतात परेही टाकले. पण, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
पुढच्या आठ दिवसात पाऊस न बरसल्यास परे धोक्यात
जून महिन्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पऱ्यांची योग्य ती वाढ झालेली आहे. भंडारा जिल्ह्यात 7 ऑगस्टपर्यंत रोवण्या केल्या जातात. त्यामुळे आजघडीला शेतातील पर्यांना धोका नसला तरी येत्या आठ-दहा दिवसात पाऊस बरसला नाही, तर हे परे धोक्यात येतील. एवढेच नाही तर ज्या पऱ्यांचे आयुष्यमान 21 दिवसांच्या वर झाले आहे. त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनात पंधरा टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.