भंडारा- महागड्या फॉर्च्युनर गाडीतून फिरून ग्रामीण भागातील लोकांचे एटीएम कार्ड क्लोन करून लाखो रुपये लुटणाऱ्या हरियाणातील चौघांना अटक करण्यात पवनी पोलिसांना यश आले आहे. या चौघांनी अगोदरही महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही अशाच पद्धतीचे कित्येक गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. यांच्याकडून एक फॉर्च्युनर कार, १० बनावट एटीएम कार्ड , ४ मोबाईल, ५० हजार रोख रक्कम, एक एटीएम क्लोन मशीन, असे साहित्य जप्त केले आहे.
आलिशान गाडीतून फिरून एटीएमधारकांना लुटणाऱ्या 4 आरोपींना अटक तुम्ही जर एटीम वापरत असाल तर सावधान... एटीएम वापरताना तुमच्या पाठीमागे जर कुणी उभा असेल तर त्याला पहिले बाहेर काढा. तसेच एटीएमचा वापर करताना काही अडचणी येत असतील तर बँकेच्या कर्मचाऱ्यांना किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्तींची मदत घ्या, जर कोणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला मदत करतो म्हणत असेल तर त्याची मदत स्वीकारू नका.
हे सांगण्यामागाचे कारण की, पवनी पोलिसांनी अटक केलेले आरोपी लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने एटीएममध्ये प्रवेश करून लाखोंचा गंडा घालत होते. पवनी तालुक्यातील कोंढा गावातील महिलेला अशाच अनोळखी व्यक्तीची मदत घेणे ९० हजार रुपयांना महागात पडले. ही महिला एटीएममध्ये गेल्यानंतर आरोपी तिच्या मागे गेले आणि तिला एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करतो, असे सांगून एकाने तिचा एटीमएम घेत आपल्या सहकाऱ्याकडे दिले. त्याने लगेच ते क्लोन करून एटीएममधून तब्बल 90 हजार काढले. याची तक्रार त्या महिलेने पवनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे आणि बँकांना माहिती देऊन चौकशी सुरू केली. घटनेच्या दिवशी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी या आरोपींना लाखांदूर पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. तसेच त्यांनी बऱ्याच लोकांना गंडा घातला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
महागड्या गाडीतून फिरणारे हे लोक आरोपी असतील, अशी कोणालाही कल्पनाही येत नव्हती आणि याचाच फायदा आरोपी घेत होते. यासंदर्भातला अधिक तपास पोलीस करत आहेत.