महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडाऱ्यात भाजप महिला कार्यकर्त्यांचे चक्का जाम आंदोलन; तेही केवळ २ मिनिटांचे - bjp agitation in bhadara news

भाजप महिला चक्काजाम आंदोलन करणार म्हणून पोलिसांनीही बंदोबस्त लावलेला होता. मात्र, आंदोलनकर्ते केव्हा आले आणि केव्हा गेले हे कोणालाही समजले नाही.

भंडाऱ्यात भाजप महिला कार्यकर्त्यांचे २ मिनिटांचे चक्का जाम आंदोलन
भंडाऱ्यात भाजप महिला कार्यकर्त्यांचे २ मिनिटांचे चक्का जाम आंदोलन

By

Published : Feb 27, 2021, 2:37 PM IST

Updated : Feb 27, 2021, 5:45 PM IST

भंडारा-संजय राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात यावी या मागणीसाठी भाजपच्यावतीने राज्यभर आंदोलने करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातही भाजप महिला मोर्चाच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले पण केवळ २ मिनिटांचे. भाजप महिला कार्यकर्त्या आल्या त्यांनी फोटसेशन केलं आणि आंदोलन गुंडाळण्यात आले. या प्रकारामुळे केवळ प्रदेशाध्यक्षांना दाखवण्याासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

भंडाऱ्यात भाजप महिला कार्यकर्त्यांचे २ मिनिटांचे चक्का जाम आंदोलन

केवळ १४ महिला आंदोलनात सहभागी.
मंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध भाजप पक्ष आक्रमक झाला आहे. राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात यावी या मागणीसाठी संपूर्ण राज्यात महिला भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे. भंडाऱ्यातही भाजप महिला अध्यक्षांनीही चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरविले. त्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौकात सर्व महिलांनी एकत्रित येण्याचे ठरविले. मात्र मोजून १४ महिला तिथे जमलेल्या. एवढ्या कमी संख्येत मुख्य रस्त्यावर चक्काजाम आंदोलन कसे करावे, असा प्रश्न महिलांपुढे निर्माण झाला. त्यामुळे चक्का जाम आंदोलन गुंडाळण्यात आले.

केवळ दोन मिनिटे घोषणाबाजी
चक्का जाम आंदोलन करता यावे एवढी महिलांची संख्या नसल्याने शेवटी काय करावे असा प्रश्न भाजप महिला कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला. आंदोलन केले नाही तर वरिष्ठ ओरडतील म्हणून चौकातील एका कोपऱ्यात बॅनर घेऊन भाजपाचे झेंडे घेत बरोबर दोन मिनिटे या महिलांनी घोषणाबाजी केली. शरद पवार जागे व्हा, महाविकास आघाडीचा निषेध, संजय राठोड यांना अटक करा, अशा घोषणा दिल्या. त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले. आणि त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लगेच आंदोलन गुंडाळण्यात आले.

आंदोलनाच्या नावाखाली केवळ देखावा
भाजप महिला चक्काजाम आंदोलन करणार म्हणून पोलिसांनीही बंदोबस्त लावलेला होता. मात्र, आंदोलनकर्ते केव्हा आले आणि केव्हा गेले हे कोणालाही समजले नाही. प्रदेशाध्यक्षांनी सांगितल्यानंतर आंदोलन करायचे होते, मात्र आंदोलन करता आले नाही म्हणून केवळ देखावा करून भाजपा महिलांनी त्यांच्या घोषणाबाजीच्या फोटो वरिष्ठांना पाठवून त्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या देखावा आंदोलनाला चक्का जाम आंदोलन कसे म्हणावे असा प्रश्न उपस्थित झाला.

Last Updated : Feb 27, 2021, 5:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details