भंडारा - जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही तरुणांची चुकी नसताना इतरांमुळे तोल जाऊन गाडीच्या मागचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. लाखनी आणि तुमसर तालुक्यात हे दोन अपघात झाले आहे. तुमसर तालुक्यतील विजय दामोदर लेंडे (वय ३२) रा. परसवाडा आणि ताहीर अली नीर मकसूद अली सय्यद (वय २५) वर्ष रा. लाखणी अशी या दोघांची नावे आहेत.
विजय हा एका लग्नसोहळ्यासाठी सायकलने तुमसरला आला होता. राजाराम मंगल कार्यालयाजवळ तो पोहोचला असता लग्नाची गर्दी होती. त्याच गर्दीतील एकाचा त्याच्या सायकल धक्का लागला आणि विजयची सायकल अनियंत्रित झाल्यामुळे त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. दरम्यान तुमसरवरून अकोलाकडे जाणाऱ्या बसचे मागचे चाक विजयच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन विजयचा जागेवरच मृत्यू झाला.