भंडारा - जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 148 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होतात आचारसंहिता लागू झालेली आहे. या निवडणूका म्हणजे आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम आहे.
कोरोनामुळे झाला उशीर-
भंडारा जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.
भंडारा जिल्ह्यातील ज्या 148 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा काल निवडणूक आयोगाने केली. या ग्रामपंचायतीचे कार्यकाळ एप्रिल ते जून या महिन्यात संपला होता. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे निवडणूक घेणे शक्य नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती केली होती.
भंडारा तालुक्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायतीचा समावेश-
निवडणूक आयोगाने घोषणा केलेल्या भंडारा जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायती पैकी भंडारा तालुक्यातील सर्वात जास्त म्हणजे 35 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यानंतर पवनी तालुक्यातील 27, लाखनी तालुक्यातील 20, साकोली तालुक्यातील 20, तुमसर तालुक्यातील 18, मोहाडी तालुक्यातील 17 आणि लाखांदूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे.
15 जानेवारीला होणार मतदान, तर 18 ला होणार मतमोजणी-
ग्रामपंचायत निवडणुकीची नोटीस तहसीलदार 15 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहेत. 23 ते 30 डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. 15 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता पासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची घोषणा होताच ग्रामीण भागांमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे.
जिल्हा परिषदेसाठी ही रंगीत तालीम आहे-
भंडारा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितीचे कार्यकाळ संपले असून कोरोनामुळे निवडणूक थांबलेली आहे. त्यामुळे येथेही प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लवकरच होईल, असे वाटत असल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राजकीय नेते आणि इच्छुक कामाला लागले आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या पहिले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक लढविणार्या राजकीय पक्षांसाठी आणि नेत्यांसाठी रंगीत तालीम ठरणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसह सरपंच पदाचे आरक्षणही जाहीर-
भंडारा जिल्ह्याच्या 541 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण ही काल जाहीर करण्यात आले. 541 ग्रामपंचायती पैकी 271 सरपंचपद हे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती साठी 90 पैकी 45 महिलांसाठी, तर अनुसूचित जमातीच्या 43 पदांपैकी 22 महिलांसाठी, नागरीकांचा मागास प्रवर्ग 146 पदांपैकी 73, महिलांसाठी आणि खुल्या प्रवर्गातील 262 पदांपैकी 131 महिलांकरिता सरपंचपद आरक्षित असणार आहे. यामध्ये तुमसर तालुक्यातील 97 , मोहाडी तालुक्यातील 76, भंडारा 94, पवनी 79, साकोली 62, लाखनी तालुक्यातील 71 आणि लाखांदूर तालुक्यातील 62 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
हेही वाचा-केरळमध्ये कोरोना लस मोफत मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
हेही वाचा-घरी बसून कामे केल्याने भूमीपूजन करता येतात- उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला