भंडारा - केस दानाचे महत्त्व नागरिकांना कळावे यासाठी भंडारा शहरातील अकरा नागरिकांनी त्यांचे केस दान केलेले आहेत. विशेष म्हणजे, या 11 पैकी दहा महिला आहेत, तर एका पुरुषाने दोन वर्षे स्वतःचे केस वाढवून त्यानंतर केस दान केलेले आहे. हे केस दान नेमके कशासाठी केले जातात आणि त्याचा फायदा कोणाला होतो, या विषयी जाणून घेऊया.
हेही वाचा -Vidarbha Winter : ना ऊन.. ना पाऊस म्हणून हिवाळ्यात असते खेळण्याची हौस!
कर्करोगग्रस्तांसाठी केस
सध्या देशात कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या आजाराच्या उपचारपद्धतीत अनेकदा रुग्णांच्या डोक्यावरील व भुवयांचे केस गळतात. आधीच कर्करोगाने ग्रस्त राहणारा रुग्ण स्वतःला या अवस्थेत पाहून खचून जातो. त्यामुळे, निर्माण होणारा न्यूनगंड आजारावर मात करताना बरेचदा अडचणीचा ठरतो. हा न्यूनगंड निघून जावा म्हणून अशा रुग्णांना कृत्रिमरित्या तयार केलेल्या केसांचा टोप (विग) घातला जातो. देशात बऱ्याच सामाजिक संस्थांद्वारे गरजू कर्करोग रुग्णांना या कृत्रिम केसांचा टोप मोफत दिल्या जातो. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेले केस दान करणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. केस दान करण्याचे प्रमाण वाढावे, नागरिकांमध्ये या दानाविषयी ही जागृती निर्माण व्हावी यासाठी भंडारा जिल्ह्यातील अकरा लोकांनी एक प्रशंसनीय पाऊल उचलले आहे.
राहुल श्यामकुवर यांनी घेतला पुढाकार
भंडारा शहरातील वैशाली नगर येथे वास्तव्याला असलेले राहुल श्यामकुवर यांच्या आईला 2017 मध्ये कर्करोग झाला होता. उपचारादरम्यान त्यांचे केस गळाले. स्वतःची अवस्था पाहून त्या खचल्या आणि 2019 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. या दरम्यान रुग्णालयात एका कृत्रिम पुतळ्यावर केसांचा टोप म्हणजेच, विग ठेवलेला त्यांना दिसला. अधिक चौकशी केल्यानंतर काही संस्था कर्करोगग्रस्तांसाठी मोफत केसांचा टोप तयार करून त्यांचे वाटप करतात, अशी माहिती मिळाली. उत्सुकतेपोटी त्यांनी अधिक चौकशी केली असता टाटा मेमोरियल इन्स्टिट्यूट मुंबई येथे अशा केसांचा विग मोफत वितरण केले जाते हे लक्षात आले. त्याचवेळी टॉप तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या केसांचे दान करणाऱ्यांची संख्या ही नगण्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आईची व्यथा आणि केस दानप्रती असलेली अनास्था पाहून राहुल यांनी टाटा मेमोरियल इन्स्टिट्यूटला केस दान करण्याचा निर्णय घेतला. केस दान करताना असलेली पहिली महत्त्वाची अट म्हणजे, केसांची लांबी 12 इंच असणे गरजेचे होते.