भंडारा - येथील कोथुर्ना गावात 104 लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे लॉकडाउन काळात 200 लोकांपेक्षा ज्यास्त लोकांना या कार्यक्रमात बोलाविण्यात आले होते. वास्तु पुजेच्या कार्यक्रमात हे जेवन दिले गेले. या सर्व लोकांना कोथुर्ना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती ठीक आहे.
कोथुर्ना गावातील 104 लोकांना वास्तु पुजेच्या जेवणानंतर विषबाधा, सर्वांची प्रकृची ठीक वापरात नसलेल्या विहिरीचे पाणी वापरले
कोथुर्ना गावातील गजानन खोकले यांच्या घरी बुधवारी वास्तु पुजेचा कार्यक्रम होता. सुमारे 200 लोक या कार्यक्रमाला आले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अशा कार्यक्रमासाठी फक्त 50 लोकांना परवानगी असताना, इतके लोक जमवले गेले. तसेच, या कार्यक्रमासाठी कुणाची परवानगीही घेण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, स्वयंपाक बनविण्यासाठी घरामागील उपयोगात नसलेल्या विहिरीचे पाणी वापरले गेल्याची बाबाही समोर आली आहे. या कार्यक्रमात आलेल्या लोकांना दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक पोटदुखीचा, मळमळ, उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर हे सर्व लोकांनी उपचारासाठी कोथुर्ना येथील प्राथमिक केंद्राकडे धाव घेतली.
प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वांवर उपचार
या घटनेची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. चोले यांनी सर्व रुग्णांवर उपचार सुरू केले. आतापर्यंत 104 रुग्णांवर उपचार केले गेले असून, सर्वांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. प्राथमिक तपासणीत या सर्वांना विषबाधा झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विहिरीचे पाणी आणि अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले
ह्या वास्तुपूजनाचे आयोजक गजानन खोकले यांनाही विषबाधा झाली असून, त्यांच्यावरही उपचार करण्यात आले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी जावून जे जेवन बनवले होते त्याचे आणि विहिरीतील पाण्याचे नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी पाठवले आहेत. या सर्व लोकांना अन्नातून किंवा न वापरलेल्या विहिरीच्या पाण्यातून ही विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तपसणीचे अहवाल आल्यानंतर नक्की कोणत्या कारणामुळे विषबाधा झाली हे समोर येईल असेही आरोग्य अधिकारी म्हणाले.
कोरोनाच्या नियमांना हरताळ
राज्यात कोरोनाची स्थिती अजूनही बिकट आहे. लॉकडाउन (15 जून) पर्यंत वाढवण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने, जिल्हा प्रशसानाकडून थोडी शिथिलता मिळाली आहे. मात्र, अजूनही सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाला परवाणगी नाही. मात्र, ग्रामीण भागात छुप्या पध्दतीनो कार्यक्रम सुरु असल्याचे दिसून येत आहे.