बीड- बीड येथील युवा सेनेचे विधानसभा अधिकारी राहुल गोकुळ फरताळे यांच्यावर आज (गुरुवारी) दुपारी 1 वाजता सारडा नगरी परिसरात दोघांनी तलवारीने हल्ला केला. यामध्ये राहुल फरताळे जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दुपारी सारडा नगरी समोर दोघांनी हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, राहुल फरताळे हे सावता माळी चौकाच्या दिशेने आपल्या घरी चालले असताना सारडा नगरी समोर अचानक दोघांनी समोरून येऊन डोळ्यात चटणी टाकली व मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान एकाने पोटात कुकरीचा वार केला असल्याचे राहुल यांनी सांगितले.