बीड - घेतलेली उचल परत केल्यानंतरही शेत मालकाकडून व्याजाच्या 5 हजार रुपयांसाठी जीवे मारण्याची धमकी येत होती. जमीन मालकाच्या या सततच्या त्रासाला कंटाळून सालगड्याने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराजवळील चनई येथे मंगळवारी घडली. याप्रकरणी शेतमालकावर ॲट्राॅसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. लहू धर्माजी मोरे (वय ३८, रा. चनई, ता. अंबाजोगाई) असे त्या मृत सालगड्याचे नाव आहे.
याबाबत प्राथमिक तपासात मिळालेली माहिती अशी -
गेल्या वर्षी लहू हा चनई येथील रवी नरहरी कदम याच्या शेतात सालगडी होता. परंतु तो सतत मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ करत असल्याने लहूने त्याचे काम सोडले व टाकळगावला (जि. लातूर) येथे निघून गेला. रवीने त्या ठिकाणी जाऊन उचलीच्या २० हजारांसाठी त्याच्याकडे तगादा लावला होता. तसेच, तो बळजबरीने लहूला चनईला आपल्या शेताकडे घेऊन गेला. त्यानंतर लहूने नवीन शेतमालक चंद्रकांत माणिकअप्पा उडगे यांच्याकडून २० हजार रुपये घेऊन रवीला दिले. मात्र, त्या रकमेवर पाच हजार रुपये व्याजाची रक्कम अधिक दे, म्हणत रवीने पुन्हा त्याच्याकडे तगादा लावला होता. सहा महिन्यापूर्वी तो लहूला बळजबरीने घरातून घेऊन गेला आणि त्याच्याच शेतात काम करावे, म्हणून जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला. त्याने लहूचा मोबाईलदेखील काढून घेतला. रवीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर लहूने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी समोर आला.