बीड- शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. 20 ते 25 दिवसातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे बीड नगरपालिकेवर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात महिलांनी हंडा मोर्चा काढला. विशेष म्हणजे बीड नगरपालिकेवर संदीप क्षीरसागर यांचे काका भारतभूषण क्षीरसागर यांची सत्ता आहे. त्यामुळे काकांच्या विरोधात पुतण्याने मोर्चा काढल्याचे पाहायला मिळाले.
बीडमध्ये पाणी पेटले; पाणीटंचाई विरोधात महिलांचा नगरपालिकेवर हंडा मोर्चा
शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. 20 ते 25 दिवसातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे बीड नगरपालिकेवर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात महिलांनी हंडा मोर्चा काढला.
बीड नगरपालिका शहराला पाणी पुरवठा करण्यास अकार्यक्षम असल्याचे सांगत संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, बीड शहरातील जनतेचे पाण्याअभावी हाल होत आहेत. याठिकाणी चक्क 20 ते 25 दिवसांनी शहराला पाणी पुरवठा केला जात आहे.
त्यामुळे पालिका शहराला सुरळीत पाणीपुरवठा करू शकत नसेल, तर नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनील धांडे, हेमा पिपळे, बबन गवते यांची उपस्थिती होती. त्याबरोबरच शहरातील महिलांचीही यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.