बीड - जिल्ह्यात मागील ३-४ वर्षांपासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे अल्पभूधारक शेतकरी उध्वस्त झाला आहे. कर्जबाजारीपणा व नापिकी यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्य निर्माण झाले आहे. एकीकडे ही नकारात्मक परिस्थिती असताना केज तालुक्यातील महिला गृहउद्योगाच्या माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करत आहेत. या महिलांनी गृह उद्योगांमधून कुरड्या, पापड्या, सांडगे, खारवड्या, अशी उन्हाळी वाळवणे तयार करून पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहेत.
महिलांनी बनवलेल्या या वाळवणाला शहरातून चांगली मागणी आहे. दर ३-४ दिवसाला एक टेम्पो भरून उन्हाळी वाळवण पुणे, मुंबईला विक्रीसाठी जात असल्याचे नवंचेतना सर्वांगीन विकास केंद्राच्या समन्वयक ज्योती सांबरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय नेत्याच्या आणि प्रशासनाच्या मदतीशिवाय महिलांनी हा लघुउद्योग प्रकल्प उभारला आहे. नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या माध्यमातून गृह उद्योग करणाऱ्या महिलांसाठी कर्ज पुरवठा केला जातो.
छोटा-मोठा उद्योग उभारण्यासाठी महिलांना सर्वतोपरी मदत करतो, यामध्ये दुग्ध व्यवसाय अथवा उन्हाळी वाळवण तयार करून बाजारात विक्रीसाठी नेण्यास देखील आमची मदत असते. यामध्ये उपक्रमात केज तालुक्यातील ४५० बचत गट काम करत आहेत. पुणे आणि मुंबई येथे नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्यावतीने एक स्टॉल उभारुन या महिलांच्या उत्पादित वस्तू आणि उत्पादनांची विक्री केले जाते, असे नवचेतना विकास केंद्राकडून सांगण्यात आले आहे.