बीड- विलगीकरणात आलेल्या नैराश्यातून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील निरपणा येथे शनिवारी रात्री समोर आली आहे. ही महिला ज्यांच्या शेतात कामाला जात होती तो शेतकरी दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आत्महत्या केलेल्या महिलेला विलगीकरणात राहण्यास सांगितले होते. मात्र, या दरम्यान महिलेने कोरोनाच्या धास्तीने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सुमन गणपती शिंदे (वय ४५, रा. निरपणा, ता. अंबाजोगाई) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सुमन शिंदे निराधार असल्याने एकट्याच राहत होत्या.
विलगीकरणात आलेल्या नैराश्यातून महिलेची आत्महत्या; अंबाजोगाई तालुक्यातील घटना - सुमन शिंदे आत्महत्या
विलगणीकरणात आलेल्या नैराश्यातून महिलेने आत्महत्या केली आहे. ज्या शेतात मजूर म्हणून कामाला जात असत त्या शेत मालकाला कोरोना झाल्याने तेथील मजुरांना विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले होते. त्यात सुमन शिंदे यांचाही समावेश होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी सुमन शिंदे गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी तो शेतकरी पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे सुमन यांना देखील घरातच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्यांनी राहत्या घरी ओढणीच्या साह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच बर्दापूर ठाण्याचे प्रभारी प्रमुख एपीआय संदीप दहिफळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण काळजी घेत पीपीई कीट घालून पंचनामा केला.
मृतदेह स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. महिलेच्या मृत्यू पश्चात थ्रोट स्वॅब घेण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच अंत्यविधीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.