बीड -एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घटना बीड जिल्ह्यात प्रत्यक्षात घडली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील मच्छिंद्र शिंदे यांचा चार वर्षांपूर्वी परभणी येथून हरवलेला मुलगा आधार लिंकमुळे सापडला आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांचा मुलगा सापडल्याचा आनंद गगनात मावत नव्हता.
या बाबत सविस्तर माहिती अशी, बीड जिल्ह्यातील मच्छिंद्र शिंदे चार वर्षांपूर्वी परभणीला मुलासह गेले असता त्यांचा भीमराव नावाचा मुलगा हरवला खूप दिवस शोधूनही तो सापडला नाही. परभणी जिल्ह्यातील काही समाजसेवकांना तो मुलगा मिळून आला, त्यांनी समाज कल्याण समिती समोर त्या मुलाला आणले. त्यानंतर त्या मुलाची रवानगी तुळजापूर येथील 'आपलं घर' या अनाथाश्रमात करण्यात आली. तिथे भीमरावचे मूळचे नाव कोणालाच माहीत नव्हते, त्यामुळे त्याचे हनुमान घाडगे असे नाव 'आपलं घर' परिवाराच्या वतीने ठेवण्यात आले. अलीकडच्या काही दिवसांमध्ये हनुमान घाडगे म्हणजेच मूळ भीमराव शिंदे याचे आधार कार्ड काढण्याचे काम आपले घर आश्रमाच्या माध्यमातून सुरू झाले. मात्र, हनुमान घाडगे याचे पूर्वीचे आधार कार्ड काढलेले असल्यामुळे नवीन आधार कार्ड निघत नव्हते. यावरून हनुमान घाडगे उर्फ भीमराव शिंदे याचे पूर्वीचे नाव मुंबई येथील आधार केंद्रात मिळाले. त्याच्या घराचा पत्ता देखील मिळाला आणि हनुमान घाडगे हा पुन्हा भीमराव मच्छिंद्र शिंदे झाला. 'आपलं घर' या तुळजापूर येथील संस्थेने माजलगाव येथील मच्छिंद्र शिंदे यांना शोधून कार्ड व त्यांचा चार वर्षांपूर्वी हरवलेला भीमराव त्यांना परत केला. चार वर्षानंतर आपला मुलगा पुन्हा आपल्याला मिळाला असल्याचा आनंद शिंदे कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर झळकत होता. आधार लिंकमुळे शिंदे कुटुंबीयांच्या घरात पुन्हा चार वर्षानंतर आनंदी वातावरण निर्माण झाले असल्याचे भीमरावचे वडील मच्छिंद्र शिंदे यांनी सांगितले.