महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टाळेबंदीचा फटका : आता आम्ही पिकवलेले टरबूज-खरबूज विकायचे कुठे? शेतकऱ्यांनी मांडली कैफियत...! - बीड कोरोना अपडेट

दुसऱ्या टप्प्यात लागलेल्या टाळेबंदीचा फटका व्यापाऱ्यांप्रमाणेच शेतकऱ्यांना देखील बसत आहे. शेतकऱ्यांचे कलिंगड विक्रीसाठी तयार झाले आहेत. बळीराजाने लाखो रुपयांचा खर्च करून पिकवलेला आपला माल (टरबूज- खरबूज) टाळेबंदीमुळे विकायचा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला हा आढावा.

बीड
बीड

By

Published : Mar 27, 2021, 6:03 AM IST

बीड- तालुक्यातील लोणी येथील फळ उत्पादक शेतकरी जयसिंग जाधव यांनी आपली कैफियत मांडली आहे. जाधव यांच्या शेतात एकूण तीन एकर क्षेत्रावर फळबाग आहे. यामध्ये दीड एकर क्षेत्रावर टरबूज तर दीड एकर क्षेत्रावर खरबूज लागवड केलेली आहे. ही दोन्ही फळपिके आता काढणीला आलेले आहेत. साधारणता टरबुजाचे उत्पादन 25 टन तर खरबूज 19 ते 20 टन निघेल. टाळेबंदी नसती तर 10 ते 12 रुपये किलोने टरबूज विक्री झाली असते. मात्र, आता किलोमागे चार ते पाच रुपये देखील भाव मिळेल का नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा सर्व माल टाळेबंदी नसते तर औरंगाबाद, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या शहरांमध्ये सहजपणे विक्रीसाठी गेला असता, मात्र आता टाळेबंदी होत असल्याने सर्वच प्रमुख शहरातील बाजारांची स्थिती अत्यंत खराब आहे. परिणामी तीन एकर फळबाग क्षेत्रांमध्ये 14 ते 15 लाख रुपये उत्पन्न मिळाले असते. मात्र, आता चार लाख देखील उत्पन्न मिळेल की, नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे शेतकरी जयसिंग जाधव म्हणाले.

बीड

आठ दिवसात खरबूज विकण्याचे आव्हान-
टाळेबंदी व खरबुजाचे पीक एकाच वेळी आले. आता इथून पुढे दहा दिवस आहे व आमच्याकडे आलेले खरबूज आठ दिवसात विक्री झाले नाही तर ते फेकून द्यावे लागेल टाळेबंदीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात माल विकायचा कसा व कुठे? असा प्रश्न आमच्या समोर असल्याचे शेतकरी जाधव म्हणाले.
असा झाला आहे खर्च-
साधारणता अडीच महिन्यापूर्वी दीड एकर क्षेत्रावर टरबूज व दीड एकर क्षेत्रावर खरबूजची लागवड केली. एकूण तीन एकर क्षेत्रावरील या फळबागांसाठी सव्वा ते दीड लाख रुपयांचा खर्च केला. यासाठी स्वतंत्र शेततळ्याची व ठिबक सिंचनाची व्यवस्था देखील केलेली आहे. वेळेवर औषध फवारणी केली. अपेक्षा होती की यावर्षी उन्हाळ्यात टरबूज व खरबूजला चांगली मागणी असेल, मात्र दहा दिवसांसाठी जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी जाहीर केली आणि जयसिंग जाधव यांच्यासारख्या फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले. बीड जिल्ह्यात दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर यंदा टरबूज-खरबूज यासह इतर काही फळझाडांची नव्याने लागवड झाली आहे. हे सर्व शेतकरी टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.
नुकसान भरपाई देण्याची मागणी -
आम्ही फळझाडांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळून चांगले उत्पादन घेऊन देखील टाळेबंदीमुळे आमचे आर्थिक नुकसान झालेले आहे. शासनाने आमच्या झालेल्या नुकसानीचे पाहणी करून पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील आता बीड जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकरी करू लागले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details