महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 3, 2019, 5:23 PM IST

Updated : Jun 3, 2019, 7:24 PM IST

ETV Bharat / state

कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळ मुक्त करणार - देवेंद्र फडणवीस

कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात आणून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करु असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा खोऱ्याचे २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला देणार आहे.

कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात आणणार - मुख्यमंत्री

बीड - कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात आणून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करु असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा खोऱ्याचे २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला देणार आहे. यासाठी २५ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महत्वकांक्षी असणाऱ्या पाडा प्रकल्पादेखील मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मागच्या ५ वर्षात भाजपने केलेले प्रामाणिक काम पाहून हे जनता पुन्हा आम्हाला संधी दिल्याशिवाय राहणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गोपीनाथ गड परळी

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री महादेव जानकर, खासदार रणजितसिंहत नाईक निंबाळकर, परभणीचे खासदार बंडू जाधव, नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे यांची उपस्थिती होती.

दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना स्वच्छ पाणी देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. लवकरच नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यात वॉटर फिल्टर तयार करून स्वच्छ पाणी देण्याचा प्रकल्प राज्य सरकार हाती घेत आहे. येणाऱ्या काळात मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. सध्या बीड जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे. यासाठी सरकारने १४ कोटी दुष्काळी अनुदान वाटप केले आहे. याशिवाय चारा छावणी व हाताला काम देण्याचा प्रयत्न हे सरकार करत असून भीषण दुष्काळात आमचे सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पराभूत करून खासदार झालेले प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, की माझ्या कातड्याची चप्पल करून जनतेला दिली तरी माझ्यावर या जनतेने केलेल्या उपकाराची परतफेड होऊ शकणार नाही. खरं तर 3 जून हा दिवस म्हणजे आमच्यासाठी सगळे संपलेला दिवस आहे. मात्र, वंचित बहुजन व गोरगरीबांच्या प्रेमामुळे पुन्हा आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते. गोपीनाथ गड म्हणजे उर्जेचा स्त्रोत आहे. येणाऱ्या काळात सामान्य जनतेसाठी मी संघर्ष करत राहणार असल्याचे मुंडे म्हणाल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले. तरुणांना रोजगार मिळावा यासाठी मी प्रयत्न करत आहे. घाणेरडे राजकारण आम्ही कधीच करत नाही. मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्यासंबंधी मुख्यमंत्री व आमचे सरकार सकारात्मक असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक गोपीनाथ गडावर आले होते.

Last Updated : Jun 3, 2019, 7:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details