बीड - जिल्ह्यातील परळी घाटनांदुर फावडेवाडी या रस्त्यासाठी 86 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असताना देखील सदरील रस्त्याचे काम थातूरमातूर केले जात आहे. याबाबत पिंपरी येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत बांधकाम विभागाकडे तक्रार देखील केली आहे.
86 कोटी रूपयाचे बजेट असून देखिल काम दर्जेदार होत नसल्याचा आरोप -
घाटनांदूर येथून जाणारा परळी-घाटनांदूर फावडेवाडी रस्त्याचे भूमीपूजन स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले व आपल्या भाषणात रस्ता दर्जेदार करण्याची तंबी देवूनही कंत्राटदार आपली मनमानी करत आहेत. रस्त्याच्या कडेच्या साईड पट्टया भरुन मधला रस्ता न करता त्यावर मुरुम व खडी टाकून थातुर- मातुर रस्ता करण्याचा उद्योग चालवला आहे. या 36 कि. मी.च्या रस्त्याच्या कामासाठी तब्बल 86 कोटी रूपयाचे बजेट असून देखिल काम दर्जेदार होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
36 कि. मी.च्या कामाला 86 कोटी मंजूर होऊनही काम थातुर-मातुर; ग्रामस्थांनी व्यक्त केली नाराजी 'रोड पूर्ण झाला तर तब्बल १५ ते २० वर्षे या रोडवर एक छदामही खर्च नाही होणार' -
महाराष्ट्र रस्ते सुधार योजनेतून 86 कोटी रुपयांच्या परळी-फावडेवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाला. हे काम डी.पी.जे. कन्सस्ट्रक्शन, पुणे हा खासगी कंत्राटदार करीत आहे. घाटनांदूर मधून चोपनवाडी-पिंप्री- फावडेवाडीत गेलेल्या या रोडच्या कामात फक्त दोन्ही बाजूची साईडपट्टी भरुन मधला रस्ता / बॉक्स न उकरता तसाच ठेवून त्यावर माती मिश्रित मुरुम भरुन खडी टाकून दबई करण्यात येत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जमीणवर काळ्या मातीचा थर असल्याने रस्त्याचे काम किमान अर्धा मिटर खोल खोदून मुरूम खडी भरुन दबई करणे आवश्यक आहे. मात्र, कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याशी संगणमत करून निकृष्ठ पद्धतीने काम करून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. एकदा रोड पूर्ण झाला तर तब्बल पंधरा ते विस वर्ष या रोडवर एक छदामही खर्च होणार नाही. पालकमंत्र्यानी मतदार संघातील कामाकडे लक्ष देण्याची गरज असून याबाबत पिंपरीचे माजी सरपंच पाराजी कातकडे, उपसरपंच बालासाहेब डोंगरे यांनी लेखी निवेदनाद्वारे संबंधित विभागाकडे तक्रार दिली आहे.
'प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून काही ठिकाणी सुधारणा करण्याचा सल्ला' -
या बाबत अंबाजोगाई सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. सी. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमचे काम केवळ सुपरविजनचे आहे असे म्हणाले. या रोडसाठी नोडल एजन्सी/ कॉलिटी कंट्रोलचे संतोष बोबडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून काही ठिकाणी सुधारणा करण्याचा सल्ला मी दिला आहे.