बीड- गेवराईच्या भारतीय जनता पक्षात दलालांचा भरणा असून निष्ठावंतांचा विश्वासघात केला जात आहे. ज्यांना आमदार करण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. त्याच कार्यकर्त्यांना विद्यमान आमदारांनी वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप विजयसिंह पंडित यांनी केला आहे. मात्र आता तेच कार्यकर्ते करत त्या आमदाराला त्यांची आता जागा दाखवणार असल्याचे टीकास्त्रही त्यांनी यावेळी केले. गेवराई तालुक्यातील चकलांबा सर्कल अंतर्गत सुशी, वडगाव, चिखली, कवडगाव आणि बंगालीपिंपळा आदी गावांच्या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेताना बोलत होते.
विजयसिंह पंडित यांनी चकलांबा सर्कलमध्ये विविध गावांचा दौरा करून कार्यकर्ते आणि मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंडित म्हणाले, आपल्या भागाच्या विकासासाठी मला सेवा करण्याची संधी द्या, विरोधकांच्या भुलथापांना आणि फसव्या आश्वासनांना बळी पडू नका. ज्यांना मोठ्या विश्वासाने तुम्ही निवडून दिले, त्यांनी सर्वांचा विश्वासघात केला आहे. ज्या कार्यकर्त्याने ज्यांच्या आमदारकीसाठी जिवाचे रान केले त्याच कार्यकर्त्यांना विद्यमान आमदारांनी वाऱ्यावर सोडले, मात्र, अशा विश्वासघातकी आमदाराला आता कार्यकर्ते सोडणार नाहीत, तर तेच कार्यकर्ते त्यांचा पराभव करतील असेही ते म्हणाले.