बीड- विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी गुरुवारी संत नगद नारायण स्वामी यांचे समाधी स्थळ, नारायण गड येथे नारळ फोडून व पुढे भगवान गडावर जाऊन प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना अशोक हिंगे म्हणाले की, बीड विधानसभा मतदारसंघात मागील पंधरा वर्षात प्रस्थापित नेते विकास करू शकले नाहीत. जनतेला भूलथापा देणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना जनताच जागा दाखवेल, असे सांगत अशोक हिंगे पुढे म्हणाले की, विकासाची गंगा वंचित बहुजन व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम येणाऱ्या काळात प्रकाश आंबेडकर करणार आहेत. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी जनतेने उभे राहावे, असे आवाहन उमेदवार अशोक हिंगे यांनी केले. यावेळी बीड विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.