तरुणाचे मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन बीड: जिल्ह्यात तरुणाने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. तरुणाच्या विविध मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे तरुणाने थेट शोले स्टाईल आंदोलन केले. शिवाजी माने या तरुणाने बीड शहरातील 150 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. तब्बल दीड तासाहून अधिक वेळेपासून हा तरूण मोबाईल टॉवरवर चढून घोषणा देत आहे.
तरूणाचे शोले स्टाईल आंदोलन : बीड जिल्ह्यातील आष्टीच्या वाहिरा गावातील तरुणाने मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. बीड शहरातील पोलीस पेट्रोल पंपाच्या समोरील टॉवरवर चढून तब्बल दीड तासाहून अधिक वेळेपासून तरुणाचे हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत उतरणार नाही असा पवित्रा तरुणाने घेतला आहे.
तोपर्यंत खाली उतरणार नाही : तरूणाने आंदोलनाला सुरूवात केल्यानंतर पोलिस प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या तरुणाला खाली उतरण्यासाठी पोलीस विनंती करत आहेत. मात्र जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत उतरणार नाही यावर तरुण ठाम आहे. या आंदोलनामुळे मात्र प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
आंदोलनकर्त्या तरूणाची मागणी : वाहिरा गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने अपघात घडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जातांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असून देखील उपस्थित राहत नाहीत. यासह विविध मागण्यांसाठी शासन दरबारी अनेक वेळा निवेदन पत्र व्यवहार आंदोलन करून देखील प्रशासन दखल घेत नसल्याने आज तरुणाने आक्रमक पवित्रा घेतला. बीड शहरातील पोलीस पेट्रोल पंपाच्या समोरील टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यलयासमोर बेमुदत उपोषण : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना काळात अधिग्रहण केलेल्या वाहनांचे बिल काढण्यासाठी टक्केवारी मागितली जात आहे. 10 टक्के द्या त्यानंतर बिल घ्या, असे सांगितले जात आहे, असा गंभीर आरोप कोरोना काळात प्रशासनाचा आधार झालेल्या वाहनचालक अन मालकांनी केला आहे. आपल्या वाहनांची बिल मिळावे यासाठी काही दिवसांपूर्वी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनधारकांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. यादरम्यान त्यांनी हा गंभीर आरोप केला होता.
हेही वाचा :BJP Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयावर मोर्चा; भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात