परळी (बीड) -वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनामुळे पीपीई कीट, हातमोजे, मास्कच्या कचऱ्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. यातच आज (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एका वेडसर व्यक्तीने शहरात धुमाकूळ घातला. वापरलेले पीपीई कीट आणि मास्क घालून परळीच्या रस्त्यावर हा वेडा फिरत असल्याचे दिसून आले.
जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक...
परळीच्या कचरा संकलनात रस्त्याच्या कडेला रुग्णालयात वापरण्यात येणारे सुरक्षा उपकरणे फेकल्या जात आहेत. वापरलेले पीपीई कीट, हातमोजे, मास्क यांचा खच रस्त्यावर पडत असल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. पीपीई किटचा कचरा निचरा जिथल्या तिथे झाला पाहिजे. मात्र, हा कचरा रस्त्यावर येत असल्याने कोरोना काळात ही धोकादायक बाब आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जैविक कचऱ्याची विल्हेवाट प्रशासनाने नेमून दिलेल्या निर्देशांप्रमाणे लावणे बंधनकारक आहे. घातक कचरा उघड्यावर फेकणे गुन्हा आहे. यामुळे याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.