बीड- तब्बल दीड महिन्यानंतर सोमवारी बीड जिल्ह्यातील अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. दरम्यान बीड शहरातील सुभाष रोड, बस स्थानक परिसर, नगर रोड, बार्शी नाका, जालना रोड आदी भागात व्यापाऱ्यांनी सकाळी साडे नऊच्या दरम्यान आपली दुकाने सुरू केली.
बीडमध्ये अनलॉक प्रक्रिया सुरू; सकाळी 7 ते 4 पर्यंत दुकाने राहणार खुली - बीड कोरोना न्यूज
तब्बल दीड महिना दुकाने बंद असल्यामुळे दुकानात मोठ्या प्रमाणात धूळ, कचरा साचला होता. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच व्यापारी व कामगार दुकानांच्या साफसफाईसाठी कामाला लागले होते. हे चित्र बीड शहरातील सर्व भागात पाहायला मिळाले.
सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत दुकान सुरू
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात टाळेबंदी केली होती. मात्र, आता सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी आपली भावना व्यक्त करताना व्यापारी कल्याण बांड म्हणाले, की माझे इलेक्ट्रिकल दुकान आहे. माझ्याकडे आठ ते दहा मजूर काम करतात. मात्र, मागील दीड महिन्यापासून दुकान बंद असल्यामुळे त्यांची प्रचंड हेळसांड झाली. याशिवाय आमच्यावर देखील उपासमारीची वेळ आली होती. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग कमी होऊन पुन्हा नव्याने सोमवारपासून दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. सोशल डिस्टन्स व सॅनिटायझर या सर्व नियमांचे पालन करून आम्ही सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवणार आहोत.
साफ सफाई करण्यात गेले दोन तास
तब्बल दीड महिना दुकाने बंद असल्यामुळे दुकानात मोठ्या प्रमाणात धूळ, कचरा साचला होता. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच व्यापारी व कामगार दुकानांच्या साफसफाईसाठी कामाला लागले होते. हे चित्र बीड शहरातील सर्व भागात पाहायला मिळाले.
पुन्हा अनलॉक होत असल्याचा आम्हाला आनंद
बीड शहरातील सुभाष रोड मार्गावर गुळाचा चहा विकणारे शहाजी काळे म्हणाले, की मागील दीड महिन्यापासून आमचे दुकान बंद होते. यामुळे गाळा भाडे, बँकेचे हप्ते व नोकरांचे पगार द्यायचे कसे? असा प्रश्न होता. मात्र, आता पुन्हा नव्याने दुकाने सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून आम्ही आमची दुकाने सुरू ठेवणार आहोत. पुन्हा नव्याने दुकाने सुरू होत असल्याचा आम्हाला आनंद होत आहे.