बीड Beed Crime News :बीडमध्ये एका गावात 17 वर्षीय पुतणीवर चुलत चुलत्यानंच जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 'तुझ्या मैत्रिणीशी माझे संबंध जुळवून देण्याची' मागणी चुलत्यानं पुतणीकडं केली. त्यानंतर ही घटना घडली आहे. गंभीर जखमी तरुणीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणीचा गळा, छातीसह पोटावर चाकूनं चुलत्यानं 10 ते 12 वार केले आहेत. त्यामुळं तरुणी गंभीर जखमी झालीय. तसंच या घटनेमुळं गावातील सर्व मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संशयित आरोपीनं अगोदर देखील गावातील मुलीची छेडछाड केल्याचं आईवडिलांचं म्हणणं आहे.
चुलत चुलत्याविरोधात गुन्हा दाखल : बीडपासून काही अंतरावर असलेल्या गावात एक 17 वर्षीय तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. रविवारी तिच्या चुलत चुलत्यानं या तरुणीसोबत वाद घालत ‘तुझ्या मित्राशी माझे संबंध जुळवून देण्याची' मागणी केली. त्यानंतर तिच्यावर चुलत्यानं चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात चुलत चुलत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपीविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये 307 प्रमाणे गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीनं आत्महत्या केली आहे. याची नोंद बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहे - कैलास भारती, पोलीस निरीक्षक, पिंपळनेर पोलीस स्टेशन