बीड - स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणावर बाधा होऊ लागली आहे. २४ तासांत दोन पोलीस अंमलदारांचा कोरोनामुळे बळी गेला. पोलीस नाईक सुबराव जोगदंड व पोलीस अंमलदार दीपक सुळ अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान, आतापर्यंत जिल्हा पोलीस दलातील सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पोलीस नाईक सुबराव जोगदंड (५३) हे बॉम्बशोधक व नाशक पथकात कार्यरत होते. १८ एप्रिल रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले व प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कुटुबीयांनी अधिक उपचारासाठी औरंगाबादला हलविले. तेथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान ३० एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजता त्यांचा मृत्यू झाला. सुबराव जोगदंड यांनी दरोडा प्रतिबंधक पथकात उल्लेखनीय कामगिरी केली होती. पोलीस अंमलदार दीपक सुळ (३५) हे पोलीस दलाच्या मोटार वाहन विभागात कर्तव्यावर होते. २७ रोजी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ३० एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबार वाजता त्यांचे निधन झाले. २४ तासांत दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याने जिल्हा पोलीस दल हळहळले आहे.