पोलीस ठाण्यातच दोन गटात तलवार अन् चाकूने राडा, माजलगाव ग्रामीण ठाण्यातील प्रकार - बीड गुन्हे वृत्त
बीडमध्ये पोलीस ठाण्यातच दोन गटामध्ये तलवार आणि चाकूने हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
बीड - परस्परविरोधी तक्रारी नोंदवण्यासाठी गेलेल्या दोन गटांमध्ये पोलीस ठाण्यामध्येच तलवार आणि चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या गोंधळात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.
माजलगाव येथील संतोष गायकवाड व योगेश गायकवाड या दोघांमध्ये पैशाच्या कारणातून मारहाणीचे प्रकार झाले होते. या प्रकरणी फिर्याद देण्यासाठी दोन्ही गट माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी संतोष गायकवाड यास चक्क पोलीस ठाण्यातच योगेश गायकवाडवर वैभव व्यवहारे याने तलवारीने हल्ला केला. यावेळी योगेश यांनीही आपल्याकडील चाकू काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मध्यस्थी करणारे एक पोलीस कर्मचारीही जखमी झाले असून ठाणे अंमलदारांच्या केबिनची नासधूस झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी योगेश ज्ञानदेव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून संतोष गायकवाड, सोनाजी उत्तम गायकवाड, आकाश बबन जाधव व इतर पाच ते सहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर संतोष उत्तम गायकवाड याच्या फिर्यादीवरून योगेश गायकवाड, वैभव व्यवहारे यांचे विरुद्ध भादंवि 307 (34) आर्म एक्ट 353नुसार गुन्हे दाखल केले आहेत. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून दोन हल्लेखोर तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.