बीड -मागील एक महिन्यापासून राज्यातील बारा ऊसतोड कामगार मुकादम यांच्या संघटनांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मात्र, आता ऊसतोड मजुरांचे नेतृत्व करणाऱ्या भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यातच ऊस तोडणी दरावरून मतभिन्नता असल्याचे शनिवारी समोर आले आहे.
ऊसतोडणी दर वाढीवरून पंकजा मुंडे-सुरेश धस यांच्यात मतभिन्नता हेही वाचा -जगप्रसिद्ध बस्तर दसरा : जाणून घ्या या 12 अनोख्या प्रथा!
ऊस तोडणी दरामध्ये 150 टक्के वाढ द्या - आमदार सुरेश धस
राज्यभरातील ऊसतोड कामगार व मुकादम यांना ऊस तोडणी दरामध्ये 150 टक्के वाढीव दर द्यावा, या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून ऊसतोड कामगारांचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत दर वाढवून मिळणार नाही तोपर्यंत हातात कोयता घ्यायचा नाही, असे राज्यभरातील ऊसतोड कामगार व मुकादम संघटनांनी ठरवले होते. या सगळ्या ऊसतोड कामगारांच्या आंदोलनामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी महाराष्ट्र पिंजून काढला व ऊसतोड कामगारांचे आंदोलन तीव्र केले. यानंतर पंकजा मुंडे यादेखील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.
ऊस तोडणी दरामध्ये 21 रुपये वाढ द्या - पंकजा मुंडे
महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना 21 रुपयांची वाढ द्यावी, अशी जाहीर मागणी पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई येथील एका कार्यक्रमात शनिवारी केली होती. दरम्यान, त्यांच्याच पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी मात्र ऊसतोड कामगार व मुकादम यांच्याबाबतीत पंकजा मुंडे यांच्यापेक्षा वेगळी मागणी केली आहे. जोपर्यंत ऊसतोड कामगार, मुकादम यांना ऊस तोडणी दरामध्ये 150 टक्के वाढ मिळणार नाही, तोपर्यंत एकाही ऊसतोड कामगार आणि मुकादम यांनी ऊस तोडणीसाठी जाऊ नये, असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले होते. 27 ऑक्टोबर रोजी साखर संघाची अंतिम बैठक होणार आहे. या बैठकीत जो निर्णय होईल त्यानंतरच ऊसतोड कामगार व मुकादम संप मागे घेतील, अशी भूमिका आमदार सुरेश धस यांनी घेतली आहे.
यो दोन वेगवेगळ्या भूमिकांमुळे माजी मंत्री पंकजा मुंडे व भाजपचे आमदार सुरेश धस या दोघांच्या वक्तव्यामध्ये मतभिन्नता असल्याचे यानिमित्ताने चव्हाट्यावर आले आहे. आता या सगळ्या ऊसतोड कामगारांच्या संप प्रक्रियेमध्ये ऊसतोड कामगार हे माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे ऐकून केवळ 21 रुपये ऊस तोडणी दर निर्णय मान्य करणार की, महाराष्ट्र पिंजून काढलेल्या आमदार सुरेश धस यांच्या मागे उभे राहणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.