बीड -तालुक्यातील जातेगाव येथे रविवारी सायंकाळी अल्पवयीन मुलीसह एका विवाहित व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गावातील शिक्षकाने बदनामी कल्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचे मुलीने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
बाळू विठोबा जाधव (वय २९) व १५ वर्षीय मुलगी अशा दोघांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्रीपासूनच हे दोघे बेपत्ता होते. बाळू हे विवाहित असून त्यांना दोन मुले व एक मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. बाळू गावातीलच एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करत होते. तर, मुलगी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शेजारी असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरी येणे- जाणे असायचे. हे दोघे फोनवरदेखील बोलायचे त्यामुळे गावातीलच एका शिक्षकाने त्यांच्याबद्दल बदनामीकारक चर्चा केली होती. या दोघांच्या प्रेमसंबंधाची चर्चा गावात झाल्याने अल्पवयीन मुलगी तणावाखाली होती.
'आई, बाळूकाकांच्या घरच्यांना त्रास देऊ नकोस. आमच्या दोघात काहीही नव्हतं. आम्ही फक्त फोनवर बोलत होतो. काही नसताना 'त्या' सरांनी साऱ्या गावात केलं' अशी चिठ्ठी मुलीने लिहून ठेवली होती. मुलगी शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता अचानक घरातून गायब झाली. शेजारी राहणारे बाळू जाधव हेदेखील बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी बाळूवर संशय व्यक्त करत त्यांच्याविरुध्द तलवाडा पोलिसात तक्रार दिली. सहाय्यक निरीक्षक सुरेश उनवणे यांनी बाळूवर रविवारी पहाटे दीड वाजता अपहरणाचा गुन्हा नोंदवला.
हेही वाचा - पतीने विभक्त राहणार्या पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल; बदनामीची धमकी देत मुलाचा मागितला ताबा
रविवारी सकाळी पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केला. दुपारी तीन वाजता गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मनोहर मस्के यांच्या शेतातील विहिरीत मुलीचा मृतदेह आढळून आला. यावेळी काठावर बाळू जाधव यांचे पाकीट सुसाईट नोट आढळून आली. सुरुवातीला बाळू जाधव यांनी तिचा घातपात केला असावा, अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु, काही वेळाने त्यांचाही मृतदेह याच विहिरीत आढळला. दोघांचेही मृतदेह पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. तिथे उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. दोघांच्याही नातेवाईकांचे जवाब नोंदवून योग्य ती कारवाई केली जाईल, असे सहाय्यक निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सांगितले आहे. ज्या शिक्षकाचा सुसाईट नोटमध्ये उल्लेख आहे, त्याचीही चौकशी केली जाणार आहे.