महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन भावांचा खून - बीडमध्ये दोन सख्या भावांची हत्या

बीड जिल्ह्यातील नागापूरमध्ये दोन भावांची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. क्षुल्लक कारणांवरून १५ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून आरोपींनी हे कृत्य केले. प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

two brothers Murdered in beed district
बीडमध्ये शुल्लक कारणावरून दोन भावांचा खून

By

Published : May 18, 2021, 12:29 PM IST

बीड - पंधरा दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. चक्क दोन भावांचा भर रस्त्यातच कुर्‍हाडीने वार करून खून केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागापूर येथे घडली आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

राम साळुंके ( ५० ) व लक्ष्मण साळुंके ( ४७ ) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षुल्लक कारणावरून १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे रूपांतर दोन भावंडांच्या खुनात झाले. कुऱ्हाडीचे घाव घालत दोन भावांना निघृणपणे संपविण्यात आले. १५ दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुंके याने दोन्ही भावांना शिवीगाळ केली होती. तेव्हा हा वाद आपसात मिटला होता; परंतु सोमवारी परमेश्वरने दोघांना फोनवरून शिवीगाळ केली. याबाबत त्याला समजवण्यासाठी रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळुंके गेले होते. यावेळी भररस्त्यात त्यांच्यावर कुर्‍हाडीने घाव घालून खून करण्यात आला. या घटनेनंतर उपअधीक्षक संतोष वाळके, सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शव जिल्हा रुग्णालयात पाठविले. मंगळवारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. परमेश्वर साळुंकेविरुद्ध पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे.

आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना-

या प्रकरणातील आरोपी परमेश्वर साळुंखे हा खून करून फरार झालेला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले असल्याची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रमुख शरद भुतेकर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details