बीड- तालुक्यातील बहिरवाडी शिवारात दोन एकर उसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना बुधवारी (दि. 3 डिसेंबर) दुपारी दोन वाजता घडली. या आगीमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या उसाला आग लागण्याच्या घटना बीड जिल्ह्यात घडत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विनोद शेषराव साळुंखे यांची बीड तालुक्यातील बहिरवाडी शिवारात जमीन आहे. त्यांचा तेथे दोन एकर उसाचा फड आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता अचानक उसाच्या फडाच्या बाजूने गेलेल्या विद्युत तारेमुळे शॉर्टसर्किट झाल्याने उसाच्या फडाला आग लागली होती. जेव्हा आग लागली तेव्हा उसाच्या शेतीजवळ कोणीच नव्हते. त्यामुळे आगीने उग्ररूप धारण करत अख्खा उसाचा फडच आगीच्या भक्ष्यस्थानी आला. यामुळे शेतकरी विनोद साळुंखे यांचे प्रचंड नुकसान झाले असून बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून ऊसाच्या फाडाला आग लागण्याच्या छोट्या-मोठ्या घटना सातत्याने घडत आहेत. ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी विद्यूत तारा जमिनीलगत लोंबकळत असलेले चित्र पाहायला मिळते. विद्यूत तारा ताणून घेतल्या तर अशाप्रकारे शॉर्टसर्किट होण्याचे प्रमाण कमी होईल. मात्र, महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांच्या उसाचे मोठे नुकसान होत असून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी शेषराव साळुंके यांनी केली आहे.