बीड - राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचा प्रशासन प्रयत्न करत आहे. या उपाय योजनांतर्गत महाशिवरात्रीच्या दिवशीही परळी वैजनाथ मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना दर्शन घेता येणार नाही. पायरीचे दर्शन घेण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, या दृष्टीकोनातून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
परळी वैजनाथ मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे विविध ठिकाणी मार्ग बंद -
वैद्यनाथ मंदिराच्या दिशेने जाणार्या पोलीस स्टेशन, वैजनाथ गल्ली, दक्षिणमुखी गणपती मंदिर येथे पोलीस प्रशासनाकडून बॅरिकेटस् लावण्यात येणार आहेत. 100 पोलीस कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले असून कोणालाही या परिसरात प्रवेश करू दिला जाणार नाही. गर्दी टाळण्यासाठी उपाय योजनांचा एक भाग म्हणून हा बंदोबस्त लावण्यात आला आहे. परळी हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैजनाथाच्या वास्तव्याने पावन झालेले शहर आहे. दरवर्षी येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते. नगर परिषदेच्यावतीने देखील शिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे यात्रा महोत्सवाचे आयोजन रद्द करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील अन्य शिवालयांमध्ये देखील यात्रा भरणार नाहीत.
उत्सवासंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना -
कोरोनाच्या अनुषंगाने मागील वर्षापासून सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अजूनही अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता आज(गुरुवारी) असलेला महाशिवरात्री हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गृह विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.