परळी (बीड)- तालुक्यात कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नसल्याने प्रभारी पदभार सोपविला जात आहे. मात्र, ज्यांच्याकडे ही जबाबदरी सोपविली ते अचानक वैद्यकीय रजेवर गेल्याने गटशिक्षणाधिकारी कार्यालयाची कामे खोळंबली आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील शिक्षकांचे पगार रखडले आहेत.
नेमणूक होताच वैद्यकीय रजेवर -
जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे पगार झाले आहेत. परंतु परळी पंचायत समितीत कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नसल्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार रखडले आहेत. गटशिक्षणाधिकारी म्हणून हिना अन्सारी यांची प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्या मेडिकल रजेवर गेल्यानंतर कापसे यांना गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार दिला. त्याही वैद्यकीय रजेवर गेल्या आहेत. त्यानंतर रंगनाथ राऊत यांच्याकडे पदभार देण्यात आला. परंतु तेही मेडिकल रजेवर गेले आहेत. एका पाठोपाठ एक याप्रमाणे पदभार दिलेले तिन्ही गटशिक्षणाधिकारी रजेवर गेल्याने कामेही खोळंबली आहेत. सध्या परळी तालुक्याला गटशिक्षणाधिकारीच नाहीत. त्यामुळे सर्व शिक्षकांचे पगार रखडले आहेत. कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकाऱ्यांची नेमणूक करून शिक्षकांचे पणार करावेत, अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भारत शेरकर यांनी केली आहे.
हेही वाचा - कोविड योध्दा होता नाही आलं तरी कोविड दूत होऊ नका; मुख्यमंत्र्यांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला