बीड - वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव शिवारात रविवारी पहाटे वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. यावेळी वीज पडून तीन म्हशी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. यासह टरबूज व खरबूज शेतीचे देखील नुकसान झाले आहे. याबाबत महसूल मंडळाला कळवले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी म्हशीच्या मालकाने केली आहे. वीज पडून झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू पाहायला मिळाले.
तीन म्हशी दगावल्या, दीड लाखांपेक्षा जास्त नुकसान -
खळवट येथील महादेव गणपत जाधव यांच्या मालकीच्या तीन म्हशी रविवारी पहाटे वीज पडून दगावल्या आहेत. यामध्ये दगावलेल्या तीन म्हशींची किंमत दीड लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे महादेव जाधव यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी महादेव यांचे खूप नुकसान झाले आहे.
हेही वाचा -भाजप पदाधिकाऱ्याविरोधात तक्रार देणाऱ्या अशोक नवले यांची आत्महत्या
पिकांचेही नुकसान, हातातला घास हिरावला -
या वादळी पावसामुळे शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या सुगीचे दिवस सुरू आहेत. गहू, हरभरा, ज्वारी या पिकांची काढणी सुरू आहे. मात्र अचानक आलेल्या वादळी पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात टरबूज व खरबूज आहेत. भर उन्हाळ्यात टरबुजांचे चांगले पैसे होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, अवकाळी पाऊस झाल्यामुळे वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव शिवारात शेतकऱ्यांच्या खरबुजाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अद्यापपर्यंत महसूल मंडळाचा एकही कर्मचारी अथवा अधिकारी गावाकडे फिरकला नसल्याचे येथील नागरीक जगदीश फरताडे यांनी सांगितले.
हेही वाचा -वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट; काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान
उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर, शासनाला भरपाईची हाक-
मोठ्या कष्टाने आम्ही चार म्हशी सांभाळत आहोत. मात्र रविवारी पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज पडून आमच्या चार पैकी तीन म्हशी जागीच ठार झाल्या आहेत. दुभत्या म्हशी मेल्यामुळे आता आम्ही जगायचं कसं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदरच माझे व पत्नीचे वय झाल्यामुळे आम्हाला मजुरी करायला जमत नाही. त्यातच आता आमच्या म्हशी देखील गेल्या. आमचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने आम्हाला आमचे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी महादेव जाधव यांनी केली आहे. तेव्हा आता शासन त्यांना किती भरपाई देईल? हे पाहणे महत्त्वाचे आहे.