आष्टी (बीड) - गावात कोरोनाची तपासणी करण्यात आलेल्या पथकाला एका व्यक्तीने धमकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या रामदास सुर्यभान खाडे असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदासने अँटिजेन तपासणीत कोरोनाबाधित निघालेल्या व्यक्तींना गावाबाहेर घेऊन जायचे नाही असे म्हणत पथकाला धाक दाखवला होता. एवढेच नाही तर कोरोना तपासणी कॅम्पही बंद करायला लावला होता.
तपासणीसाठी आलेल्या पथकाला धमकावले
आष्टी मतदार संघात कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी गावोगावी कॅम्प उभारत अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. दि. 10 मे रोजी सुपरवायझर महेश शिंदे यांच्यासह ज्ञानेश्वर बोडखे, जुबेर शेख,शंकर मोरे, अमोल वाघमारे हे कऱ्हेवाडी येथे सकाळी दहाच्या सुमारास कॅम्प घेण्यासाठी गेले. तिथे सुरळीत कामकाज सुरू असताना दोन पाॅझिटिव्ह व्यक्ती आले. त्यांना पथकाने तिथेच बसवून तुम्हाला घेऊन जाण्यासाठी गाडी येऊन उपचारासाठी घेऊन जाणार असल्याचे सांगितले. परंतु दुपारी दोनच्या सुमारास रामदास खाडे नावाचा व्यक्ती आला. त्याने हा कॅम्प कुणाच्या सांगण्यावरून घेता? तुमचा संबंध काय? लवकर हा कॅम्प बंद करा नाहीतर तुमच्या गाड्या फोडून टाकीन आणि तुम्हालाही बदडून काढीन, असे म्हणत आर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या. यावर महेश शिंदे यांनी हे आमच्या घरचे काम नसून सरकारी काम असल्याचे सांगताच रामदास खाडे यांनी तू मला शिकवू नकोस गप गुमानं गावाबाहेर जा नाहीतर तुला इथेच मारेन, अशी धमकी दिली. परिणामी कऱ्हेवाडी गावातील कॅम्प दुपारीच गुंडाळावा लागला. कॅम्प बंद झाल्यावर रामदास खाडे तिथून निघून गेला. याबाबत महेश शिंदे यांनी गावातील सरपंच, उपसरपंच यांना माहिती देऊन आष्टी पोलिसांमध्ये महेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून रामदास सूर्यभान खाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करण्याची मागणी
रामदास खाडे हा कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांना, अधिकाऱ्यांना त्रास देत असतो. सध्या कोरोनाचा काळ असून लोकांचे नुकसान न करता त्यांना आधार देण्याची गरज आहे. परंतु रामदास खाडेवर याचा काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे रामदासवर कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.