बीड- बाजारात विक्रीसाठी आलेल्या सोयाबीनचा भाव यंत्राद्वारे काढला जातो. सोयाबीनमधील आर्द्रता किती आहे, हे यंत्राद्वारे तपासूनच सोयाबीनचा भाव ठरत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळते. जिल्ह्यातील काही भाग वगळता सोयाबीन उत्पादनाची स्थिती बरी आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचे व्यापारी गौतम नाईकवाडे यांनी सांगितले.
यंदा बीड जिल्ह्यात 2 लाख 41 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झालेला होता. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे काही भागातील सोयाबीनचे पीक वाया गेले. मात्र, ज्या भागात सोयाबीन पिकाची स्थिती बरी आहे. तेथील सोयाबीन आता बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहे. यंदा सोयाबीनला प्रति क्विंटल 3 हजार 500 ते 3 हजार 800 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. येणाऱ्या काळात सोयाबीनचा भाव अजून वाढण्याची शक्यता आहे.