बीड- सासू-सुनेच्या नात्याबाबत कधी थट्टेचा विषय असतो तर कधी कटूता असते. मात्र, यापेक्षा वेगळा प्रकार म्हणजे भारतातील एकमेव सासू-सुनेचे मंदिर बीडमध्ये आहे. या मंदिराची स्थापना साधारणतः वीस-पंचवीस वर्षांपूर्वी विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रेरणेतून झालेली असल्याचे जगदीश पिंगळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे बीड येथील या सासू-सुनेच्या मंदिरात दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. यामध्ये उत्कृष्ट सासू-सून असलेल्या महिलांचे सत्कार करण्याची प्रथा येथील मंदिरात आहे.
बीड शहरात सासु सुनेचे मंदिर उभा करण्यामागे एक विचार आहे. डॉ. रामचंद्र पारनेरकर महाराज यांच्या पत्नी सौभाग्यवती मनकर्णिका माता व त्यांची सून विमल माता या दोघी नात्याने सासू-सुन होत्या. यामध्ये मनकर्णिका यांचा मृत्यू 1950 मध्ये झाला तर विमल यांचा मृत्यू 1987 मध्ये झाला. या दोघींमध्ये प्रचंड स्नेह होता. त्याकाळात त्यांनी सासू-सुनेचे नाते कसे असावे हे आपल्या कृतीतून दाखवून दिले होते. भारतात एकत्र कुटुंब पद्धती महत्त्वाची मानली जाते. यामुळेच कुटुंब व्यवस्था अत्यंत भक्कम आहे. कौटुंबिक स्वास्थ्य जर टिकवायचे असेल तर घरात सासू-सुनांची नाते स्नेहाचे राहणे गरजेचे आहे हे जाणून पूर्णवाद वर्धिष्णू ॲड. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रेरणेने बीड ला सासू-सुनेचे मंदिर उभारण्यात आले. या मंदिराच्या माध्यमातून सासू-सुनेच्या नातेसंबंधात स्नेह निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम मोठ्या उत्साहाने राबवले जात असल्याचे सुमती पिंगळे या सांगतात.