बीड- एकीकडे देशात व राज्यात राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जाती धर्मात द्वेष पसरवण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवल्या जात आहेत तर दुसरीकडे कुठलाही गाजावाजा न करता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.) येथील अखंड हरिनाम सप्ताहमध्ये ( Akhand Harinam Saptaha ) समाप्ती दिवशी पवित्र रमजानच्या महिन्यात रोजा असणाऱ्या मुस्लिमांसाठी पंगतीचे आयोजन केले होते. यातून ग्रामस्थांनी सामाजित एकतेचा संदेश दिला आहे.
अखंड हरिनाम सप्ताहात रोजेदारांसाठी पंगतीचे आयोजन; पाटोदा ग्रामस्थांनी दिला सामाजिक एकतेचा संदेश
भोंगा, हनुमान चालिसा यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील पाटोदा (ता. अंबाजोगाई) येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्तीच्या ( Akhand Harinam Saptaha ) दिवशी रोजा असलेल्या मुस्लिम समाजातील नागरिकांसाठी जेवणाच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. हरिनाम सप्ताहात मुस्लिम समाजातर्फे हिंदू समाजातील नागरिकांसाठी नाष्ट्याची सोय करण्यात येते. अशा प्रकारे येथील ग्रामस्थांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा गाव तसे विधायक कामात नेहमी अग्रेसर असते. विविध विधायक चळवळीत नेहमीच पुढे असण्याची परंपरा लाभली आहे. गावाचा अखंड हरिनाम सप्ताहची परंपरा गेल्या 26 वर्षांपासून कायम आहे. या सप्ताहात सर्व जाती धर्माचे गावकरी हिरिरीने भाग घेतात. राम नवमी ते हनुमान जयंती या कालावधीत सप्ताह उत्साहात संपन्न होत असतो. या सप्ताहात मुस्लिम समाजातर्फे नाष्ट्याची पंगतही असते. राज्यात अजानचा भोंगा आणि हनुमान चालिसावरून राजकीय वातावारण तापलेले आहे. मात्र, संधीसाधू प्रवृत्तीला कोणीही बळी पडणार नाही, असा संदेश पाटोद्यातील ग्रामस्थांनी दिला आहे.
हेही वाचा -बीडमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन 4 वर्षांपासून घरात डांबून ठेवलेल्या पत्नीची अखेर सुटका