बीड (परळी) - तुमच्या मुलीसोबत लग्न करतो, मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या, अशी वैद्यकीय अधिकाऱ्याने परळीतील मुलीसाठी तिच्या कुटुंबीयांकडे मागणी घातली. यानंतर साखरपुडा झाला. मात्र, हुंडा दिल्यानंतर या व्यक्तीने परस्पर दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. दरम्यान, या वैद्यकीय अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डॉ. संदीप वसंतराव मंत्रे (रा. सोमेश्वर नगर, परळी) असे या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.
'लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी घेतले सात लाख रुपये'
हा वैद्यकीय अधिकारी लातूर जिल्ह्यातील साकोळ (ता.शिरूर अनंतपाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, गेल्यावर्षी १८ सप्टेंबर रोजी संदीप त्यांच्या घरी आला. मी सध्या वैद्यकीय अधिकारी असून मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या. मी तुमच्या मुलीशी लग्न करतो, अशी त्याने मागणी घातली. मुलगा डॉक्टर आहे, स्वतः मागणी घालत असल्याने, स्वतःच्या मुलीचे भविष्य चांगले होईल या आशेने वडिलांनी संदीपसोबत मुलीचे लग्न जमवले. त्यानंतर २३ सप्टेंबररोजी दोन्हीकडील काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साखरपुडाही झाला. २१ ऑक्टोबर रोजी मुलीच्या वडिलांनी ठरल्याप्रमाणे सात लाख रुपये संदीपच्या घरी नेऊन त्याच्या वडिलांकडे दिले आणि लग्न यावर्षी ५ मे रोजी करण्याचे ठरले.