बीड- शेत नांगरणीवरून वाद झाल्याने कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्ण तोंडावरचा मास्क काढून त्याच्या चुलत भावाच्या तोंडावर व अंगावर थुंकल्याचा धक्कादायक प्रकार केज तालुक्यातील सारुकवाडी येथे घडला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा घरातच विलगीकरणात होता. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, सारुकवाडी येथील सुभाष फुंदे व त्याची आई कुसूम फुंदे हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ते दोघे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. गावातील श्रीराम पांडुरंग फुंदे हे व त्यांचा मुलगा दीपक श्रीराम फुंदे हे दोघे बापलेक शेतात पळाट्या काढत होते. यावेळी त्यांना सुभाष फुंदे शेताची नांगरणी करत असताना दिसला. तेव्हा चुलत भाऊ दीपकने “तू आमच्या मालकीचे शेत नांगरु नको, तुझेच शेत नांगर’, असे म्हणाला. त्यावरून वाद निर्माण झाला असता, सुभाषने मास्क काढून दीपक यांच्या तोंडावर व अंगावर थुंकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.