बीड-रस्ता मजबुतीकरण कामाची मोजमाप पुस्तिका (एमबी) देण्यासाठी गुत्तेदाराकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज सायंकाळी बार्शी नाका परिसरात करण्यात आली.
दरम्यान, भ्रष्टाचार रोखण्यासाठी सुरू असलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहातच जिल्हा परिषदेतील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. वशिष्ट मसू तावरे (वय ५२) असे लाच घेणाऱ्या शाखा अभियंत्याचे नाव आहे. तो जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग क्र. २ मध्ये कार्यरत आहे. डोंगरी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात रस्ता मजबुतीकरण कामे मंजूर आहेत. केज तालुक्यातील घाटेवाडी येथे तक्रारदाराच्या मजूर संस्थेने ९ लाख रुपयांची रस्ता मजबुतीकरणाची कामे केली आहेत. त्याचे देयक मंजूर व्हावे, यासाठी गुत्तेदाराला शाखा अभियंता वशिष्ट तावरे याच्याकडून मोजमाप पुस्तिका हवी होती. मोजमाप पुस्तिका देण्यासाठी वशिष्ट तावरे याने २७ ऑक्टोबर रोजी गुत्तेदाराला ३ टक्क्यांप्रमाणे २७ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते.