बीड - हैदराबाद येथे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या युवतीवर अमानवीय अत्याचार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेसने केली आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत काँग्रेस आरोग्य सेवा सेलच्या वतीने राज्यपालांना यासंबंधीचे निवेदन दिले.
अशा प्रकारच्या घटना आपल्या देशात वारंवार घडत असल्याने देशातील माता-भगिनींना असुरक्षित वाटत आहे. गुन्हेगारांना जोपर्यंत कडक शासन होणार नाही, तोपर्यंत अशा घटना घडतच राहतील. ही एका युवतीचा हत्या नसून मानवतेची हत्या आहे. मागणी करणाऱ्यांच्या भावनांची दखल घेऊन पिडीतेच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी गुन्हेगारांना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी,असे या निवेदनात म्हटले आहे.