बीड - मागील वर्षभरात कोरोनाच्या संकटामुळे राज्यात सर्वत्र टाळेबंदी होती. याच दरम्यान व्यवसाय धोक्यात आल्यामुळे घेतलेले कर्ज फिटणार कसे? या विवंचनेतून एका कापड व्यापाऱ्याने स्वतःच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. याबाबत बीड तालुक्यातील नेकनुर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून या घटनेमुळे व्यापाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचे वास्तव समोर येत आहे.
कर्ज कसे फेडायचे? नेहमी याच विवंचनेत -
गिरीश गणेश शिंदे (वय 39 हल्ली मुक्काम चौसाळा) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्यांचे नाव आहे. गिरीश यांचे बीड तालुक्यातील चौसाळा येथे कपड्याचे दुकान आहे. मागील वर्षभरात सतत कोरोनाच्या संकटामुळे टाळेबंदी असल्याने दुकान बंद ठेवावे लागले होते. यातच घेतलेले कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेत अनेक दिवसांपासून गिरीश हे असायचे. अखेर सोमवारी रात्री उशिरा कुटुंबीय जेवण करुन झोपी गेले. याच दरम्यान गिरीश यांनी दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत्या घरी दरवाज्याच्या कडीला दोरी व टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली.