बीड: अंबादास पांडुरंग उगले हे बीडच्या गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. सोमवारी पहाटे चुलत सासरे मयत झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी गेवराई येथून ते कडा (ता.आष्टी) येथे पत्नी सगुणा अंबादास उगले (वय 40 वर्षे) यांच्यासह कारने (क्रमांक MH-23 AD-0249) निघाले होते. बीडसांगवी घाटात आले असता त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने अंबादास उगले यांचा कारवरील ताबा सुटला. यानंतर कार थेट 200 फूट खोल दरीत कोसळली. या अगोदरही याच ठिकाणी बीड येथील व्यापारी असलेले तीन भाऊ गाडी दरीत कोसळल्याने अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक छोटे-मोठे अपघात या घाटामध्ये होत राहिले. त्याचबरोबर या घाटाला कठडे नसल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. हे अपघात टाळण्यासाठी प्रशासन याच्यावर योग्य ती कार्यवाही करेल का...? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
जखमी महिला रुग्णालयात दाखल: हा अपघात एवढा भीषण होता की गाडीने चार ते पाच पलट्या खाल्ल्याने व खोल दरीत कोसळल्याने चालक असलेले अंबादास उगले यांचा जागीत मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी सगुणा अंबादास उगले या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. या अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तसेच जखमीला पुढील उपचारांसाठी हलविण्यासाठी मदत केली.