बीड: बीड जिल्ह्यात काल एका दहा वर्षीय चिमुकल्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली होती आणि ही घटना ताजी असतानाच पुन्हा धारूर तालुक्यातील दहिफळ केंद्र अंतर्गत असलेल्या कासारी बोडखा येथील जिल्हा परिषद शाळेवर करत असलेले शिक्षक नितीन लक्ष्मण पाटोळे (रा. आसरडोह, धारूर) यांनी आत्महत्या केली. ते आज सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडले. शाळेकडे चाललो असे सांगून ते शाळेकडे न जाता त्यांनी गावच्या पूर्वेस घरापासून काही अंतरावर एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी 9 वाजता आसरडोह ता. धारूर येथे घडली. घटनेची माहिती पोलिसांना कळताच तात्काळ पोलीस प्रशासन घटनास्थळावर दाखल झाले.
गावात हळहळ: नितीन लक्ष्मण पाटोळे यांनी आत्महत्या केल्याचे गावात समजतात पूर्ण गावाने घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आडस चौकीचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन सिद्धेश्वर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी धारूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र शिक्षकाने आत्महत्या का केली हे कारण अद्यापही समजू शकले नाही. माहितीप्रमाणे, जिल्हा परिषदेचे शिक्षक काही दिवसांपासून विचारमग्न होते. त्यांच्या मागे नेमके काय टेन्शन होते हे देखील अजून समजू शकले नाही. मात्र त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. मात्र या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मन मिळावू स्वभाव असलेल्या शिक्षकामागे असे नेमके कोणते टेन्शन होते की ज्यामुळे त्यांनी इतके टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप अस्पष्ट आहे. याचा तपास पोलीस प्रशासन करत असून नेमके मृत्यूचे कारण काय आहे हे कळू शकले नाही.