बीड - जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात (स्वाराती) आज ऑक्सिजन अभावी सहा जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्रा याबाबत स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी शुक्रे यांनी याबाबत खुलासा करताना म्हटले आहे की, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाकडे ऑक्सिजन पुरेसा उपलब्ध आहे. मृत्यू झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे वय 60 पेक्षा अधिक असून त्यांना ऑक्सिजनची कमतरता नव्हती. परंतु, माध्यमांमध्ये चुकीचे वृत्त प्रकाशित होत असल्याचा खुलासा त्यांनी केला.
हेही वाचा -चारचाकी पलटी होऊन अपघात, एकाचा मृत्यू
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, आज सकाळी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या वयोवृद्ध 6 रुग्णांचा स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई येथे मृत्यू झाला. झालेले मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाले, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी काही माध्यमांकडे केला होता. याबाबत स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी शुक्रे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, स्वाराती रुग्णालयाकडे पुरेसा ऑक्सिजन आहे. त्यामुळे, ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होण्याचे काहीच कारण नाही. मृत्यू झालेल्या त्या सहाही रुग्णांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहेत. एवढेच नाही तर त्या रुग्णांना उच्च रक्तदाब, डायबेटीज, दमा यासह इतर व्याधी आहेत. तसेच, आज मृत्यू झालेल्या त्या सर्व रुग्णांची ऑक्सिजन पातळी रुग्णालयात दाखल होतानाच अत्यंत कमी होती. अशा परिस्थितीत रुग्णालयाकडून ऑक्सिजनची कसलीच कमतरता झालेली नसल्याचे चौकशीत पुढे आलेले आहे. असे असतानाही माध्यमांकडून चुकीचे वृत्त प्रकाशित होत असल्यामुळे बीड जिल्ह्यात निराशाजनक वातावरण निर्माण होत असल्याचे अधिष्ठाता शिवाजी शुक्रे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले.