बीड - जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. शहरातच नाही तर ग्रामीण भागातही याचा फैलाव वेगाने होत असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र काही शासकीय कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण पौळ यांनी केली आहे.
सतत गैहजार राहणारे व नागरिकांशी उद्धटपणे वागणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ मुंडे यांना येत्या आठवड्याभरात निलंबित करावे. अन्यथा त्रस्त नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करेन, असा इशारा पौळ यांनी प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात पौळ यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. आरोग्य केंद्राची जबाबदारी असलेले डॉ.सोमनाथ मुंडे कधीच तेथे हजर नसतात, याउलट त्यांचे लक्ष परळीच्या त्यांच्या खासगी दवाखान्यावर जास्त आहे. शासनाची पगार घेऊन जबाबदारीच्या कालावधीत खासगी प्रॅक्टिस करणे हा नियमाने गुन्हा आहे. सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर त्या परिसरात असणाऱ्या जवळपास 60 ते 65 गावांतील नागरिकांचे आरोग्य अवलंबून आहे. डॉक्टर स्वतः गैरहजर राहून तेथील सगळा भार कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर सोपवून देतात.