बीड- ऊस तोड कामगार आणि मुकादमांना दीडशे टक्के वाढ द्या, अशी मागणी करत महाराष्ट्रातील बारा ऊसतोड मजुरांच्या संघटना संपासाठी रिंगणात उतरल्या होत्या. मात्र वेगवेगळ्या संघटनांमधील मतभेद व राजकारण यामुळे ऊसतोड कामगारांचे नुकसान होत आहे. आता तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना ऊसतोडणीसाठी कारखान्याकडे निघा, असे आवाहन केले आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे आयोजित एका सत्कार कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या.
ऊसतोड कामगारांनाे ऊसतोडणीसाठी कारखान्याकडे निघा- पंकजा मुंडे - pankaja munde news
पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रातील ऊस तोड कामगारांनी आता ऊस तोडण्यासाठी कारखान्याकडे निघावे, असे जाहीर आवाहन केले आहे.
मी लवादावर आहे म्हणून काही संघटनांना लवादाच मान्य नाही. असे असेल तर हा प्रश्न मिटणार कसा, मी शरद पवारांना आवाहन करते की, माझ्या ऊसतोड कामगारांना 21 रुपयांची वाढ करा, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रातील ऊस तोड कामगारांनी आता ऊस तोडण्यासाठी कारखान्याकडे निघावे, असे जाहीर आवाहन केले आहे. यावेळी आमदार नमिता मुंदडा यांचीदेखील उपस्थिती होती.
लवादामधील सदस्य कारखानदार आहेत- सुशीला मोराळे
लवादामध्ये असलेले सदस्य हे कारखान्याचे चेरमन देखील आहेत. असे असेल तर लवाद ऊसतोड मजुरांची बाजू घेण्यापेक्षा ते कारखानदारांचे हित पाहतात. मागील सहा वर्ष लवादाने आमच्या ऊसतोड कामगाराच्या तोंडाला पाणी पुसले आहे. अशी भूमिका महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी व वाहतूक कामगार, मुकादम समन्वय संघर्ष समितीने शनिवारी बीड येथे पत्रकार परिषद घेऊन मांडली आहे. यावेळी ऊसतोड कामगार मुकादम संघटनेच्या प्राध्यापक सुशीला मोराळे, कॉ. मोहन जाधव, काँग्रेसचे दादासाहेब मुंडे आदींची उपस्थिती होती.