बीड- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये कडा येथील साखर कारखाना कामगार दिनकर भोसले यांचा मुलगा रवींद्र भोसले याची पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झाली आहे. रवींद्र भोसले सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
MPSC : साखर कारखान्यातील कामगाराचा मुलगा बनला डीवायएसपी
बीड जिल्ह्यातील कडा येथील साखर कारखान्याच्या कामगाराचा मुलगा रवींद्र भोसले याची पोलीस उपअधीक्षक पदावर निवड झाली आहे. रवींद्र याने बडोदा येथील नोकरी सोडून दिल्ली आणि पुणे येथे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची तयारी केली होती.
रवींद्र भोसले याचे वडील दिनकर भोसले कडा सहकारी साखर कारखान्यात कामगार आहेत. रवींद्र याचे दहावी पर्यंतचे शिक्षण कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात झाले. तो दहावीला 95 टक्के गुण मिळवत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. रवींद्र याने लातूर येथील शाहू महाविद्यालयात अकरावी-बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर पुणे येथे अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर बडोदा येथे नोकरीही केली.
रवींद्र भोसले याचे उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी दोन वर्षातच बडोदा येथील नोकरीचा राजीनामा देऊन दिल्ली येथे यूपीएससीची तयारी केली. त्या ठिकाणी अपयश आल्याने पुन्हा महाराष्ट्रात येऊन पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरू केला. दोन प्रयत्नात अयशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने राज्यसेवा मुख्य परीक्षेत यश मिळाले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.