बीड - जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी दहा दिवसाचे कडक लॉकडाऊन लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहने, दुकाने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवल्या आहेत. बीड शहरात व जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. जिल्ह्यात दोन हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दहा दिवस म्हणजे चार एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट 13 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. दिवसाला ३०० ते ३५० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात चार एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. सकाळच्या सत्रात केवळ तीन तास भाजीपाला व अत्यावश्यक वस्तू विक्रीसाठी परवानगी दिलेली आहे. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. पोलीस स्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांचे ओळखपत्र तपासत आहेत.