परळी (बीड) -समाजाला अज्ञान, घृणा आणि भौतिकवादाच्या अंधःकारातून वाचविणे तसेच शांती, एकात्मता आणि समाजाची प्रगती व्हावी, या उद्देशाने जमात-ए- इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 'अंधारातून प्रकाशाकडे' हे राज्यस्तरीय प्रबोधन अभियान २२ जानेवारीपासून राज्यभर राबविण्यात येणार आहे, असे संघटनेतर्फे सांगितले आहे. संघटनेचे भारतीय समाज विभागाचे सहायक सचिव मोहम्मद शफी फारूखी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
हेही वाचा -5 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या नोव्हेरा शेखला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
इस्लाम धर्माविषयी गैरसमजुती दूर करणार
या अभियानातून इस्लाम धर्माविषयी सामान्य नागरिकांच्या मनातील गैरसमजुतीही दूर करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे. 'कोरोना महामारीने भौतिकवादी लोकांचे डोळे उघडले आहे. या स्थितीमुळे त्यांचे सध्याचे विश्वास आणि कार्यशैलीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. म्हणून जीवन म्हणजे फक्त संपत्ती गोळा करणे नाही व भौतिक उद्देशांची परिपूर्ती एवढाच याचा उद्देश नाही. शेवटी विवेक आणि करुणेशिवाय कुठलेही सुख नाही, असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणे,' हे या अभियानाचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.