महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिला कामगारांसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधांची उपायोजना करणे गरजेचे - नीलम गोऱ्हे - आशा स्वयंसेविका

गर्भाशय पिशवी वर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शस्त्रक्रियांची गंभीरतेने दखल घेत,राज्यस्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती मंगळवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आहे. या समितीच्या निदर्शनास अनेक उनीवा आल्या आहेत.

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली

By

Published : Jul 17, 2019, 8:29 AM IST

बीड - जिल्ह्यात गर्भाशय पिशवीवर मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर ही समिती सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या समितीने गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर आज (बुधवारी) गोऱ्हे या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन वंजारवाडी या गावातील महिलांशी संवाद साधणार आहेत.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय चौकशी समिती मंगळवारी बीड जिल्हाच्या दौऱ्यावर आली आहे. या समितीत आमदार विद्या चव्हाण, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास, डॉ. शिल्पा नाईक आणि ज्योती कोटकर यांचा समावेश आहे. डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्याशी चर्चा केली. त्यांनी रुग्ण कल्याण समिती तसेच उपजिल्हा रुग्णालयातील दैनंदिन चालणाऱ्या कामकाजाची माहिती घेतली.

डॉ. गोऱ्हे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्याशी चर्चा करताना.

पाहणी झाल्यावर गोऱ्हे म्हणाल्या, ग्रामीण महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या समस्यांचा विचार करता, ऊसतोडीवर जाणाऱ्या महिला कामगारांसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधांची उपायोजना करणे गरजेचे आहे. तसेच मुलींचा जन्मदर उंचावण्यासाठी पुरुषांच्या जनजागृतीची गरज विचारात घेतली पाहीजे. यासाठी ग्रामव्यवस्थेत आशा स्वयंसेविकांसोबतच पुरूष वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे. महिलांच्या सदृढ आरोग्यासाठी रुग्णालय स्तरावर निरीक्षण व नियंत्रण प्रणाली विकसित होणे गरजेचे आहे. रुग्ण कल्याण समिती सक्षमपणे कार्यान्वित होणे गरजेचे आहे. ग्रामीण महिलांच्या आरोग्याबाबत त्यांच्या घरातील पुरुषांना देखील जागरूक राहण्याचा प्रयत्न केला पाहीजे, अशी आशा देखील विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी आरोग्य उपसंचालक एकनाथ माले , जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी बी. आर. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांनी त्यांना रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अंतर रुग्ण महिला कक्षाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांची विचारपूस केली. तसेच रुग्णालयातील उपलब्ध वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. तसेच त्यांनी रुग्णांचे नातेवाईक, नागरिक लोकप्रतिनिधी यांच्या आरोग्य सोई सुविधांच्या संदर्भातील प्रतिक्रीया जाणून घेतल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details